#६

घरकुल !!!

असावे घरकुल आपुले छान ! असावे घरकुल आपुले छान !

अंगणात तुळस, दारी रांगोळी छान, दारावर झेंडू —आंब्याच्या पानांची तोरणी कमान , "शुभ—लाभ "दारावर"सुस्वातम"छान !

नको महाल, नको मोठा बंगला, हवी फक्त चार माणसांची सावली, सांजवेळी एकत्र दिवा लागावा, आणि " शुभंकरोती " लाभली !

स्वयंपाकघरातून यावा वरण-भात, अन् तुपाचा सुवास , पडवीत वाजावा, बाळाचा हसरा आवाज !

आईच्या हातची भाकरी, जेवण चविष्ट सोबती , बाबांचा धीर ,सोबत शिस्तीचा साज , हेच तर खरे घराचे वैभव आज !

भांडण असावे, रुसवेही असावे, पण रात्रीपर्यंत सारे विसरावे, एकाने रुसताच दुसऱ्याने मनवावे, यालाच तर घरपण म्हणावे !

असावी घरात स्वच्छता,टापटीप खास , वेळेतच सर्व व्हावे हिच असे आस , आप्त पाहुण्यांची असे, सर्वदा तेथे उठबस !

हिंदोळ्यावर गाणी होती, भगिनींची छान , एकत्र भावंडे सदा असे , आपुलकीचे भान !

पैशाने घर बांधता येते, प्रेमाने घरकुल सजते, विटा, सिमेंटचे घर असते निर्जीव, माणसांनीच त्याला घरपण येते !

म्हणून मागणे एकच देवा, दे मला छोटंसं घरकुल छान, जिथे प्रेम नांदते, माया रांधते, समाधानाने भरलेलं अंगण असते !

— संदीप सु. श. परुळकर