जाते मी आज सासरी!!!
जाते मी आज सासरी, ऊभी अंतरपाटा पलीकडे, नटुन सजुन ऊभी लाल पाटी, आज मुहुर्ती या बोहल्यावरी!
अक्षता पडती आम्हा डोक्यावरी, डुलती मोत्याचे ललाट भुषण, झाली मस्तकावरी पखरण, त्याच्या टपटप तालावरी!
मंगलाष्टका जश्या पडती पुढपुढे, चुकवितो ठोका काळजाचा, आली समीप शुभघडी, सांगतो सअर्थ सनई चौघडा!
आठवणींची शिदोरी घेवून, चालले मी आज सासरी, स्वप्ने सोबत नवघराची, सासरच्या सुखाची!
सोबती माझा जोडीदार, हातात हात गुंफून जाणार, सात जन्मांची गाठ बांधून, संसाराचा वेल फुलवणार!
डोळ्यात पाणी, ओठी हसू, माहेरचं दार सुटताना, बापाच्या मिठीतलं ऊबदार जग, पाठीशी ठेवून जाताना कसा आवर मी धरु?
आईच्या पदराचा गंध घेऊन, बहिणीच्या अश्रूंची सोबत घेऊन, नव्या घरची लक्ष्मी होऊन, जाते मी आज सासरी!
आता माहेरची लेक नाही, सासरची सून होऊन जाईन, दोन्ही घरांची मान राखून, दोन्ही घरांना जोडून जाईन!
निरोप घेताना माहेरचा, पाय अडखळती अंगणी, ज्या अंगणात वाढले बागडले, ते अंगण आज परके झाले!
बाबा म्हणाले, "रडू नको बाळा, हे घर तुझंच कायमचं, दरवाजा उघडाच असेल, येत जा हक्काने माहेराला!"
— संदीप सु. श. परुळकर