पत्र!!!
पत्र लिहूनी पाठव मज तु , पण नको डोळ्यांमधल्या शाईने , नको पुसत लिहु ते तू , गालांवरच्या ओघळत्या आसवाने !
दोन नेत्रातून ओघळलेले , अश्रु मिसळून बदलतील , अर्थ आपल्या प्रेमाचा व्यर्थ नको तो डाव आता वाचू आपण धडा नवा !
नाही वाचू मी शकणार ते, थरथरत्या हातांनी लिहिलेले, नाही उमजणार मला त्याचे शब्द, अन् अर्थ त्याचे !
पोहोचतील ना तुझ्या , भावना , मोकळ्या मनातील भाव ते , मग उगाच कां ते हळहळणे , अन् ते गहिवरणे !
सोप्या शब्दातूनच व्यक्त सारे , नको काही ती जोडाक्षरे , जोडीदार मी तुझाच होईन , वचन हे तुजलाच खरे !
लिपी अन रेषसमुहातून , व्यक्त कर तू प्रेम सारे , नको आणू आठ्या अन्, नको मारू बाण , भुवयांच्या कमानीतून ते !
कागदातून नको फक्त तो , प्रेमाचा ऊमाळा , भेटशील तेव्हा मोकळा कर , दोघांमधला जिव्हाळा !
— संदीप सु. श. परुळकर